नाशिक : वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही. शहराची वाढती वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि, त्यावर प्रबोधनाची मात्रा उपयुक्त ठरत नाही. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून सिग्नल करण्यात आले, परंतु तरीही त्याचा उपयोग होत नाही. वाहतूक पोलिसांची नेमणूक किती ठिकाणी करणे शक्य आहे, या पार्श्वभूमीवर नाशिक सिटिझन फोरम या संस्थेच्या वतीने सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करण्यात आली होती. सिग्नलवर नियमभंग केल्यास सिग्नलवरील कॅमेऱ्यात असा वाहनचालक आपोआप कैद होऊन त्याला स्वयंचलित पद्धतीने दंडाची नोटीस जाऊ शकेल, अशी व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली त्याला सर्वच यंत्रणांनी मान्यताही दिली. मध्यंतरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी नाशिकला आले तेव्हा त्यांनी अशाप्रकारची यंत्रणा देशपातळीवर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील गेल्या नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारे एका कार्यक्रमात नाशिकमधील सीसीटीव्हीचा प्रश्न लवकरच सुटेल, असे सांगितले होते. परंतु त्याचा अद्याप उपयोग झालेला नाही. त्यामुळे नाशिकमध्येही कॅमरे बसवावे, अशी मागणी सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायंभग यांनी केली आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत ही कामे होण्याची अपेक्षा असली तरी त्यावर महापालिकेने हे काम न करता पोलीस यंत्रणेवर ढकलले आहे. तर पोलीस आयुक्तालयाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.
सिग्नलवर सीसीटीव्हीचा प्रश्न प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:17 AM