बरे झाले परीक्षा रद्द झाली. वर्षभरापासून ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना आता लिहिण्यापेक्षा टाइपिंगची सवय झाली आहे. लिहिण्याचा सराव राहिला नाही. लिहिताना मुलांना त्रास होतोय. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द केली ते योग्यच झाले. कोरोनाचे भूत मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे परीक्षा घेणेदेखील योग्य नव्हते. परीक्षाबाबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय योग्य आहे. - प्रवीण कासार पालक, कळवण
दहावीची प्रत्यक्ष परीक्षा न घेता केवळ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल देण्याचा शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला असला तरी ते केवळ कागदावर मूल्यमापन होणार आहे. त्यात पारदर्शकता असणार नाही त्यामुळे मुलांची बौद्धिक गुणवत्ता समजणार नाही. वर्षभर मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले, मात्र स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्प, विज्ञान प्रयोग हे शिक्षकांनी प्रत्यक्ष पाहिले नाही. त्यामुळे याचे मूल्यमापन कसे करणार, विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार न्याय मिळायला हवा.
- डॉ. बापू खालकर, पालक, सायखेडा
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने गुणवत्तेवर फरक पडण्याची भीती निर्माण झाली आहे. नववीच्या मूल्यांकनानुसार गुणवत्ता ठरली तर हुशार विद्यार्थी वर्गाला जी गुण टक्केवारी अपेक्षित आहे त्यावर परिणाम होऊन विद्यार्थी नाराज होतील. गुणवत्ता यामुळे कमी पडली तर मेरिट यादीमध्ये नंबर लावताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. पाचवी ते नववीपर्यंतची गुणवत्ता पाहून गुण टक्केवारी ठरवावी. जेणेकरून विद्यार्थी वर्गात नाराजी होणार नाही.
- रतन मेसट, पालक, लखमापूर
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन अभ्यास केला होता. परीक्षेची तयारी केली होती. मात्र कोरोनामुळे परिक्षेबाबत संभ्रमावस्था होती. राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षेसाठी निवडलेला मार्ग अन्यायकारक आहे. वर्षभर दुसरा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे,
- रवींद्र शेवाळे, पालक, मालेगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असून, याबाबत शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांचे सहामाही परिक्षेच्या गुणांच्या आधारावर मूल्यमापन करणार का, यामध्ये विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षादेखील महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत पुढील वर्गाची तयारी करावी.
- गोरख सामोरे. पालक, वंजारवाडी
मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे ऑनलाइन अभ्यास सुरू होता. परंतु शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची अंगवळणी पडलेली सवय, त्यामुळे ऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा येत होता. परीक्षा झाली असती तरी कोरोनाची मनात धास्ती होतीच, यामुळे परीक्षेतही मन लागले नसते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे.
- सृष्टी शिंदे, विद्यार्थिनी, देवळा
शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय योग्य व विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्त्व दिले आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. त्यांच्या अभ्यासावर मात्र पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेला या निर्णयामुळे प्राधान्य मिळेल की नाही, असा प्रश्न आहे,
- ओमकार गायकवाड, विद्यार्थी, चांदवड