सातपूर कॉलनीत गेल्या ४० वर्षांपासून पोस्ट इमारतीसाठी सुमारे ९०० चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आला होता. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने नगरसेवक सलीम शेख यांनी पोस्ट विभाग आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार गोडसे यांनी या भूखंडाची पाहणी करून पोस्ट ऑफिस उभारणीसाठी लागणाऱ्या विविध विभागांचे ना-हरकत दाखले मिळवून आणले. इमारत बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आणि प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारतीच्या बांधकामाचा मार्ग दोन महिन्यांपूर्वीच मोकळा झाला होता. शनिवारी गोडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. वर्षानुवर्षे रखडलेल्या टपाल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने सातपूरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, मधुकर जाधव, नगरसेविका दीक्षा लोंढे, पल्लवी पाटील, सीमा निगळ उपस्थित होते. प्रास्तविक प्रवर अधीक्षक एम.एस. अहिरराव यांनी केले. यावेळी सोपान शहाणे, बाळासाहेब पोरजे, बन्सी रायते, भाऊसाहेब भादेकर, जी.एस. सावळे, किसनराव खताळे, भास्कर सोनवणे, नरेंद्र पुनतांबेकर, योगेश गांगुर्डे, योगेश लभडे, सचिन सिन्हा, सोमनाथ पाटील, सोमनाथ ठाकरे आदींसह पोस्ट खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापूसाहेब काकड यांनी तर देवा जाधव यांनी आभार मानले.
इन्फो==
लोकमतचे विशेष योगदान
सातपूर कॉलनीतील आरक्षित भूखंडावर पोस्ट इमारत व्हावी ही नागरिकांच्या मागणीचा लोकमतने पाठपुरावा केला. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन ७ नोव्हेंबर रोजी या भूखंडाची पाहणी करण्यात आली होती. पोस्ट कार्यालय उभारणीसाठी लोकमतचे मोठे योगदान असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितले.
इन्फो ===
पोस्टासाठी पाच वर्षे, उड्डाणपुलाला पंधरा दिवस?
आपल्या भाषणात गोडसे यांनी सरकारकडे एका पोस्ट कार्यालयाच्या इमारत उभारणीसाठी पाच पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या मदतीने तांत्रिक अडचणी दूर केल्या तेव्हा कुठे या कामाला मंजुरी मिळाली. मात्र काही लोकांना (भाजपा आमदार सीमा हिरे यांना उद्देशून) अवघ्या पंधरा दिवसात उड्डाणपुलाला कशी काय मंजुरी मिळते, अशी कोपरखळी मारली.
(फोटो २१ सातपूर) - सातपूर कॉलनीतील नियोजित पोस्ट कार्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना खासदार हेमंत गोडसे समवेत मधुकर जाधव, दीक्षा लोंढे, सीमा हिरे, सलीम शेख, योगेश शेवरे आदी.