दरम्यान, नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी वापराविना पडून असलेले सुमारे २२ भूखंड बीओटीवर देण्यात येणार असून, त्या माध्यमातून महापालिकेला शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावाही महापौरांनी केला.
महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय भाषण केवळ भुजबळ यांनी केले असले तरी महापौरांनी मात्र कोरोना काळातील ऑक्सिजन पुरवठ्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना, तर रेमडेसिविरसाठी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ठाण मांडल्याबद्दल गिरीश महाजन यांनाही श्रेय दिले. मात्र, महापालिकेत नोकरभरतीची गरज असतानादेखील त्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नाशिक महापालिकेत भाजपाच्या कारकिर्दीत रस्ते, जलकुंभ. नाशिकरोडचा पाणी प्रश्न अशी विविध कामे केल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर नाशिक महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी सध्या पडून असलेले आणि अवैध धंद्यामुळे पडून असलेल्या भूखंडांवर व्यापारी संकुले, बसस्थानके तसेच विभागीय कार्यालये बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे वार्षिक उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्फो...
...तर सत्तारूढांना मदत करण्यासाठी विरोधक तयार
नाशिक महापालिकेच्या राज्य शासनाकडील प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशिकचेच असल्याने त्यासंदर्भात ते शासन दरबारी प्रयत्न करतीलच, परंतु त्याच बरोबर सत्तारूढ पक्षाला गरज पडल्यास काही वेळेस विरोधकदेखील मदत करण्यास तयार असतात, असे सांगितले.