नाशिक : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिसेंबर अखेरीस परिस्थिती सुधारत असताना शहरातील विविध बँकांसमोर नोकरदारवर्गाच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकांमध्ये येणाऱ्या भरण्याच्या आधारे ग्राहकांना पैसे दिले जात आहेत. बँका व एटीएममधून पैसे काढण्यावर अद्यापही निर्बंध असल्याने ते शक्य होत असले तरी येत्या वर्षात १ ते १० जानेवारी दरम्यान नोकरदारांचे वेतन झाल्यानंतर बँका आणि एटीएमवरील चलन पुरवठ्याचा ताण वाढण्याची चिन्हे आहेत. शहरातील विविध प्रमुख बँकांकडेही विविध क्षेत्रांतील नोकरदारांच्या वेतनाची गरज भागविण्याएवढी रक्कम नाही. कॅशलेस व्यवहार चलनटंचाईची समस्या सोडविण्यास उपयुक्त ठरू शकतात. परंतु, विविध दुकानदारांनी त्यांच्या बँकांकडे मागणी करूनही पीओएस मशीन मिळालेली नाही. अन्य साधनाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नसल्याने बहुतेक कॅशलेस व्यवहार डेबिट व क्रे डिट कार्ड अथवा चेक द्वारे होत आहे. मोबाइल वॉलेट, आॅनलाइन व्यवहार आणि इंटरनेट बँकिंगचे पर्याय वापरात आणणाऱ्या ग्राहकांची संख्या अद्यापही बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे नोटा जमा करण्याचे काम आटोपल्यानंतर सर्वप्रथम बँकांसमोर कॅशलेस व्यवहारांचे ग्राहकांना प्रशिक्षण देण्याचे आव्हान आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नोकरदार वर्गातील बहुतेकजण आपल्या कष्टाचे पैसे आपल्याच खात्यावरून एकरकमी काढू शकलेले नाहीत. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीनंतर परिस्थिती सुधारण्यासाठी दिलेल्या ५० दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपल्याने नागरिकांचा संयमही सुटत असून, येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच नोटाबंदीविषयी काय प्रतिक्रिया उमटतात नोटाबंदीच्या निर्णयाचे यश-अपयश ठरणार आहे. (प्रतिनिधी)
नवीन वर्षातही नोकरदार वर्गाच्या वेतनाचा प्रश्न
By admin | Published: December 31, 2016 12:06 AM