संजय शहाणे
इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे महापालिका गंभीरपणे पाहत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनधिकृत भंगार गुदामांमुळे अनेक अवैध प्रकार सुरू राहत असल्यामुळेदेखील आगीच्या घटत असल्याची चर्चा आहे.
वडाळा गाव परिसरात अनधिकृत भंगार गुदामांमुळे या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगार गुदामांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी असतानाही महापालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. या गुदामांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास येथील अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. विशेष म्हणजे येथील भंगार गुदामांच्या मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने गुदामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. शेतीमध्ये गुलाबाची फुले, द्राक्ष आणि पालेभाज्या अशी पिके निघत होते. जमिनीचा भाव जसजसा वाढत गेला तसतशी शेती विकली गेली. त्या ठिकाणी घरे तयार होण्यास सुरुवात झाली. परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गुंठेवार पद्धतीने जागा घेऊन त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. अंबड लिंक रोड येथील भंगार बाजार हटविण्यात आल्याने तेथील काही भंगार व्यावसायिकांनी परिसरात गुदामे उभारली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे नगर व मेहबूबनगर परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक वेळेस भंगार गुदामांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदर गुदामे हे भर वस्तीत असल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहेत. मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता लोक वस्तीतून भंगार बाजार हटविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
चौकट -
रिसायकलिंगच्या प्रक्रियेमुळे आग लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भंगार बाजाराला राजकीय वरदहस्त असल्याने भंगार हटविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात भंगार गुदामे टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. व्यावसायिक नको असलेला माल बाहेर जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-घसा या आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिकवरील प्रक्रियेमुळे प्रदूषणही वाढत आहे.