लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह अन्य वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या संपामुळे शहरी भागात भाजीपाला, दूधपुरवठा खंडित झाला असून, शहरात भाजीपाल्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये येणारा शेतमाल रोखल्याने शहरातील बाजारपेठेत संपाच्या चौथ्या दिवशीही शुकशुकाट दिसून आला. संपाच्या तिसऱ्या दिवशी फूट पडल्याची चर्चा झाल्यानंतर शहरात काही वाहनांतून शेतमाल आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी सुरक्षा देऊनही शेतकऱ्यांनी नाकाबंदी कायम ठेवीत भाजीपाल्याचा पुरवठा रोखला. नाशिककरांनी तसेच खाणावळ आणि हॉटेलचालकांनी किमान तीन-चार दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करून ठेवल्याने कालपर्यंत विशेष टंचाई जाणवली नव्हती, मात्र आता बाजारात आणि घरात तसेच व्यावसायिकांच्या साठवण कक्षातील भाजीपाला संपला असून, शहरातील भाजीपाल्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर शहराबाहेरून येणाऱ्या पिशवीबंद दुधाचा पुरवठा खंडित झाला असतानाही शहरातील घाऊक दूध बाजारात ६० रुपयांवर स्थिरावले आहे. रमजानच्या महिन्यात दुधाचे भाव वधारत असले तरी शेतकरी संपामुळे दूधपुरवठा घटल्याने किरकोळ बाजारात ६५ ते ७० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. शहराजवळील काही दूधवाल्यांनी पहाटेच्या सुमारासच दूधविक्री व वाटप केले. तर शहरातील गोठेचालकांनी नियमित ग्राहकांना प्राधान्याने दूध दिले. अन्य ग्राहकांना मात्र चढ्या दराने दूध खरेदी करावे लागले.
भाजीपाल्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: June 05, 2017 1:21 AM