ममदापूर : परिसरात वादळी पावसाने हरणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, पाण्याच्या शोधात होणारी भटकंती पुढील एक महिना तरी थांबणार आहे. राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हरणांसाठी पंधरा दिवसातून एकदा पाणवठे भरण्यात येत होते; परंतु कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन तसेच गाय, शेळी, मेंढी आदि पशुपक्षी सर्व पाणवठ्यावर तहान भागविण्यासाठी येत असल्याने नऊ हजार लिटर क्षमतेचे पाणवठे कोरडे पडल्यामुळे हरणे पाण्याच्या शोधात गावाकडे येत असत. त्यामुळे कधी कुत्र्याचा हल्ला, कधी विहिरीत पडून मृत्यूचा सामना करावा लागत असे. मात्र अवकाळीमुळे जंगलातील माती बांध, वनतळे तीस टक्के भरले आहेत. या भागात डोंगर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पाणी लगेच वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे छोटे बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले; परंतु या भागात नुकसान होईल असे काही झाले नाही, परंतु हरणासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ही चांगली गोष्ट घडली आहे. त्यामुळे या पावसाने जिल्ह्यातील काही भागात नुकसान केले असले तरी हरणांसह पशुपक्ष्यांसाठी मात्र फायद्याचा ठरला आहे. या उत्तर-पूर्व भागात अडीच हजाराच्या आसपास हरीण आहे तसेच तरस, मोर, लांडगे, खोकड इत्यादी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. (वार्ताहर)
अवकाळीने सुटला पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न
By admin | Published: March 03, 2016 10:57 PM