नाशिक : जळगावच्या आमदारांची महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यासमवेत नियोजित बैठकीची माहिती मिळाल्याने आणि ही बैठक नाशिकमधून जळगावसाठी पाणी नेण्यासंदर्भात असल्याने कसमादेविरुद्ध खान्देश असा नवीनच वाद आता पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.यासंदर्भात उद्या रविवारी (दि.१५) देवळा येथे सर्वपक्षीय नेत्यांची व स्थानिक आमदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कसमादे परिसरातील आमदारांची व जळगाव जिल्ह्यातील आमदारांची ५ नोव्हेंबर रोजी एक बैठक होऊन त्यात गिरणा धरणाच्या वरील बाजूस जलशयातून २०१५-१६ मध्ये समन्यायी पाणीवाटपाचा भाग म्हणून पाणी सोडण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री दादा भुसे, आमदार दीपिका संजय चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार आसिफ शेख, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह कसमादे परिसरातील आमदार व जळगाव जिल्ह्यातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत गिरणा धरणावरील बाजूस असलेल्या चणकापूर, हरणबारी, पूनद, केळझर या धरणातून जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या पिण्यासाठी पाणी म्हणून गिरणा धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. याची पुढील सुनावणी आता १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे होणार आहे. आधीच मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून तब्बल १२ टिएमसी पाणी सोडण्यात आल्याने मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद पेटलेला असतानाच आता कसमादे परिसरातील पाणी जळगाव जिल्ह्यात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कसमादेविरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा नवीन वाद पाणीप्रश्नी उभा राहण्याची चिन्हे आहेत. उद्या रविवारी (दि.१५) यासंदर्भात देवळा येथील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक दुपारी २ वाजता बोलविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पाणीप्रश्नावरून आता खान्देश-कसमादे वाद पेटला
By admin | Published: November 14, 2015 11:11 PM