ओझर : तीन दिवस बॅँकांना असलेली सुट्टी आणि त्यात सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये घेण्यासाठी गुरुवारी (दि.९) सकाळपासून येथील बँक आॅफ बडोदा व महाराष्ट्र बँक शाखेबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी रस्त्यावर चौकट आखत ग्राहकांना दोन्ही बाजूंनी रांगेत उभे करत नंबरनुसार आत सोडण्यात आले.सुरुवातीच्या काळात ज्या खातेधारकांनी खाते उघडून नंतर व्यवहार नाही केले अशांचे खाते निष्क्रिय झाल्याने प्रत्येकाने आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेत त्वरित खाते पुनरुज्जीवित करत पैसे काढताना दिसले. दिवसभरात जवळपास साडेतीनशे ग्राहकांनी पैसे काढत आपले घर गाठले. बँकेचे कर्मचारी प्रवेशद्वारावर उभे राहून प्रत्येक ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन तोंडाला मास्क बांधला आहे की नाही याची खातरजमा करत होते, तर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना पाण्याची सोय करून देण्यात आली. बँकेतदेखील डाव्या बाजूस महा ई-सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी बसविण्यात आले होते.
तीन महिने जनधन खात्यात पाचशे रु पये जमा होईल असे सांगण्यात आले आहे. जमा झालेले पैसे खात्यातून काढले नाही तर ते परत जातील अशी अफवा ग्राहकांमध्ये पसरली असून ती साफ खोटी आहे. ते पैसे ग्राहकांच्याच खात्यात राहणार असून त्यामुळे उगाच बँकेबाहेर गर्दी करण्याचे टाळावे. गरज असेल तेव्हाच बँकेत या. ग्राहकांचे पैसे खात्यात सुरक्षित आहे. गर्दी करून कायद्याचे उल्लंघन करू नका.- प्रवीण बावके, व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, ओझर शाखा.