नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील युनियन बँकेत जनधन खात्यावरील पैसे काढण्यासाठी ग्राहकांची तळपत्या उन्हात गर्दी होत आहे.येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गेल्या पंधरा दिवसांपासून पैसे काढण्यासाठी विशेषत: जनधन खातेदारांची मोठी गर्दी होत आहे. परिसरातील दहा-बारा गावांसाठी एकमेव राष्ट्रीयस्तरावरील बँक असल्यामुळे ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. अशातच सध्या जनधन खातेदारांची पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सकाळपासून बँकेच्या आवारात ग्राहक गर्दी करत आहेत. मात्र बँकेच्या वेळेबरोबरच कामगार वर्ग कमी असल्यामुळे व्यवहार सुरळीत होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच स्थरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मजुरांवरही काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत केंद्र शासनाने जनधन खातेदारांच्या खात्यावर पाचशे रुपये टाकल्याने या मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे असले तरी बँकेत ग्राहकांची होणारी गर्दी बघता पाचशे रुपये काढण्यासाठी तासनतास भरउन्हात रांगेत उभे राहवे लागत आहे.------------------------गेल्या काही दिवसांपासून बँकेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. फिजिकल डिस्टन ठेवून रांगा लावल्या जात आहे. तसेच एका वेळी पाचच ग्राहकांना आत प्रवेश देऊन प्रत्यकाला सॅनिटाझर दिले जात आहे तसेच परिसरातील अनेक गावात बँक मित्रांच्या माध्यमातून पैशांच्या व्यवहाराबरोबर पीककर्जाची परतफेड व नवीन कर्जाच्या मागणीचे काम गावातूनच सुरू केले आहे. ग्राहकांनी बँक मित्राच्या माध्यमातून तसेच आॅनलाइनच्या माध्यमातून व्यवहार वाढवावेत.- योगेश पाटील, शाखा अधिकारी, नायगाव
जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी बॅँकांपुढे रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:57 PM