शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आता शहरात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शन्सची गरज भासू लागली आहे. मध्यंतरी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त माधुरी पवार यांनी विक्रेत्यांसमवेत बैठक घेऊन १२०० रूपयांत इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. त्यानंतर दर आणखी कमी हाेऊन चारशे रूपये झाले परंतु मागणी वाढली आणि त्या तुलनेत अपुरा साठा असल्याने या इंजेक्शन्सची टंचाई जाणवत आहे. अन्न व औषध प्रशासनाने ६ हजार ४५६ इंजेक्शन्स मागवली होती. मात्र, नागपूर येथून अवघे ३३०० इंजेक्शन्स सोमवारी (दि.५) प्राप्त झाले. रूग्णालयांची गरज आणि नातेवाईकांना भ्रमंती करावी लागू नये यासाठी ४५ रूग्णालयांना पाठवण्यात आले. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांचे प्रिस्किप्शन घेऊन रूग्णांच्या नातेवाईकांना भ्रमंती करावी लागली. त्र्यंबक नाका येथील पिंक फार्मसी येथे तर या इंजेक्शन्ससाठी रांगा लागल्या होत्या. ज्या ठिकाणी स्वस्त दरात इंजेक्शन्स आहेत अशा सर्वच ठिकाणी रांगा लागल्या होत्या.
शहरातील रेमडेसिवीरची गरज लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने आणखी नियोजन केले असून आठ हजार रेमडेसिवीरची मागणी नोंदवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एखाद्या वेळी इंजेक्शन्स कमी संख्येने आले तरी अडचण येणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो...
रूग्णालयांच्या डॉक्टरांकडून मागवलेले इंजेक्शन त्याच रूग्णाला दिले आहे किंवा नाही याची फेरतपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अकारण कोणत्या रूग्णालयात साठा केला जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.