केंद्र शासनाकडून मुळातच अपेक्षित लसीचे डोस पुरविले जात नाही. त्यातच आता १ मेपासून १८ वर्षे वयावरील सर्वच नागरिकांना डाेस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.१) शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर झुंबड उडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिक लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र असे असताना सध्या डोसचा पुरवठा अपेक्षित मागणीनुसार होत नसल्याने अडचण झाली. अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रांवरून परत जावे लागत होते. रविवारी (दि.२५) रात्री ७६ हजार लसींचा पुरवठा झाला. त्यानंतर महापालिकेेला त्यातील ३० हजार डोस मिळाले असले तरी ते वितरित होण्यास विलंब झाल्याने बहुतांश केंद्रांवर सोमवारी लसीकरण झाले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि २७) केंद्रांवर लसीसाठी रांगा लागल्या. अनेकांना दुपारच्या सत्रात बोलवूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे शासन धोरणानुसार पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डाेस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आणि त्यामुळे गर्दी कमी झाली. अन्य इच्छुकांना मात्र केंद्रावर भर उन्हातान्हात जाऊन माघारी परतावे लागले.
शहरात सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:16 AM