ओझर : पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्यामुळे कमी दर व मायलेजमुळे सीएनजी पेट्रोल पंपावर रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहनचालकांना रात्र वाहनातच काढावी लागत आहे. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे व वाहनांना चांगले मायलेज मिळत असल्याने सीएनजी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाहने वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीकडून नाशिकमध्ये अल्प प्रमाणात गॅसपुरवठा केला जात असल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे. वाहनांचा रात्री नंबर लावला, तरच गॅस मिळतो. त्यामुळे पंपावर रात्री ९ वाजेपासूनच वाहनांची रांग लागते; परंतु पंप सकाळी ६ ते ७ वाजता सुरू होतात. काही वाहनचालक तर बाहेरगावचे असतात. त्यांच्यासोबत कुटुंबच असते, सर्वांनाच वाहनात तासन्तास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे कंपनीने सीएनजीच्या पंपावर पुरवठा वाढवावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. ओझरच्या पंपावर केवळ ४०० किलोच गॅस पाठविला जातो. मात्र, वाहने येतात २०० ते ३००. त्यात बरीचशी वाहने नाशिक, आडगाव, दिंडोरी, सायखेडा, पिंप्री येथून आलेली असतात. त्यामुळे पहाटेच रस्त्यावर एक ते दीड कि.मी.ची रांग लागलेली दिसते. मात्र, केवळ ४० ते ५० वाहनांनाच गॅस मिळतो. बाकीच्यांना तासन्तास थांबून रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे या पंपावर कंपनीने तीन गाड्यांद्वारे पुरवठा करावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
--------------------
कंपनीचा बेजाबदारपणा
नाशिकमध्ये ठरावीकच सीएनजी पंप आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक व पुरवठा कमी यामुळे सकाळी ९.३० वाजताच सर्व ठिकाणी सीएनजी संपतो. पहाटे ४ किंवा ५ वाजता आलेल्या वाहनांना गॅस मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीकडे वारंवार ऑनलाइन तक्रार करूनही त्या तक्रारीकडे साधे लक्षही दिले जात नाही. कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे सर्व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
-अजय सावंत, वाहन चालक, ओझर
-----------------------
अल्प प्रमाणात पुरवठ्यामुळे वाद
सीएनजीचा अल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने पाच ते सहा तास थांबूनही गॅस न मिळाल्यास पंप चालक व वाहन चालकांत वाद होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. हे वाद टाळण्यासाठी कंपनीने पुरवठा वाढविण्याची गरज आहे.
--
नाशिक शहरात तीन, तर जिल्ह्यात पाच पंप
नाशिकमध्ये तीन तर जिल्ह्यात पाच, असे आठच पंप आहेत. अनेक पंपांवर वर्षभरापासून यंत्रणा उभारलेली आहे. मात्र, व्होल्टेजच्या अडचणीमुळे ते अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत. पंप कमी. त्यात पुरवठाही कमी व वाहने अधिक असल्याने सीएनजीच्या कृत्रिम टंचाईने वाहनचालक कंपनीवर संताप व्यक्त करत आहेत.
--
...असे आहे दर सीएनजी - ५९.३० रुपये लिटर,
पेट्रोल - १०५.२५ रुपये लिटर, डिझेल - ९५ रुपये लिटर (०२ ओझर)
020721\02nsk_2_02072021_13.jpg
०२ ओझर