नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शिवसेनेने मुलाखती घेऊन त्यासाठी आलेल्यांची पक्षनिष्ठा तपासून पाहण्याची कोणतीही कसूर ठेवलेली नसताना दुसरीकडे मात्र नुकताच पक्ष प्रवेश केलेल्यांच्याही इच्छुक म्हणून मुलाखती घेतल्याने हा प्रकार म्हणजे ‘झट मंगणी, पट ब्याह’सारखाच असल्याची टीका निष्ठावंतांनी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सोमवारपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या मुलाखती रात्री ९ वाजेपर्यंत चालल्या, त्यात २१ प्रभागांसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती संपविण्यात आल्या. मंगळवारी सकाळी पुन्हा प्रभागनिहाय इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती सुरू करण्यात आल्या. सायंकाळी ५ वाजता या मुलाखती संपल्या. दोन दिवसांत जवळपास नऊशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्यांकडून यापूर्वीच अर्ज भरून घेण्यात आले असले व त्यासाठी त्यांना पक्षानेच आचारसंहिता ठरवून दिलेली असताना मंगळवारी मात्र ऐनवेळी आलेल्यांनाही मुलाखतीसाठी अनुमती देण्यात आली. संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, आमदार योगेश घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, सत्यभामा गायकवाड आदिंनी मुलाखती घेतल्या, त्यामुळे दिवसभर शिवसेना कार्यालय गजबजले होते. इच्छुकांच्या मुलाखतींचा सोपस्कार पार पाडला जात असताना दुसरीकडे त्याच ठिकाणी पक्षात प्रवेश देण्याचा सोहळाही दिवसभर सुरू होता. शहरातील सिंधी समाजातील जवळपास तीनशेहून अधिक नागरिकांनी संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शविली व शहरात जवळपास एक लाखाहून अधिक सिंधीबांधव असून, त्यांना या निवडणुकीत प्रतिनिधित्व दिल्यास संपूर्ण समाज शिवसेनेला पाठिंबा देईल, असा प्रस्ताव ठेवला.
झट मंगनी, पट ब्याह !
By admin | Published: January 26, 2017 12:14 AM