नाशिक : ग्रामपंचायत पातळीपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र डॉक्टर आणि काही खासगी आरोग्य संस्थांमध्ये कमिशन देऊन कट प्रॅक्टिसचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत कठोर व तितकाच पारदर्र्शी कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उघड झालेल्या एका कार्पोरेट दवाखान्यातील कट प्रॅक्टिसचा प्रकार उघड झाल्यानंतर त्याची क्लिप राज्य सरकारने मागविली असून, संबंधित विभागाचे संचालक व सचिवांना या क्लिपची सत्यता पडताळण्याचे आदेश देण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. गोरगरीब व सर्वसामान्यांची या कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून मोठी पिळवणूक होत असल्याचे गावापासून ते तालुक्यातपर्यंत आणि जिल्ह्णापासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र आढळून येत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. मात्र कट प्रॅक्टीस विरोधात कायदा करताना त्यात प्रामाणिक डॉक्टर व संस्थांना त्रास नको म्हणून त्यांचीही मते जाणून घेण्यात येत आहेत. हा कायदा पारदर्शक मात्र तितकाच कठोर असणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. पॅथॉलॉजी क्षेत्रातही चाचण्यांच्या नावाखाली कट प्रॅक्टीस केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांची या कट प्रॅक्टिसमधून दिवसाढवळ्या लूट करून पिळवणूक थांबविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कडक व व्यापक कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे आदी उपस्थित होते.
‘कट प्रॅक्टिसवर लवकरच कठोर कायदा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 1:31 AM