पेठ - मविप्र संचलित पेठ येथील अनुदानित आश्रमशाळेत पोषण आहार अभियान अंतर्गत रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने खवय्यांनी पर्वणी साधली.पेठ तालुक्यात सध्या रानावनात विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध असतात. एकीकडे रासायनिक खते व फवारणीचा मारा करून कृत्रिम रित्या बाजारात येणा-या भाज्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना आदिवासी भागातील रानावनात नैसर्गिकरित्या तयार होणा-या अनेक भाज्या आयुर्वेदिक दृष्टया रामबाण समजल्या जात आहेत. पोषण आहार अभियानाचे औचित्य साधून नागरिकांना रानभाज्यांची ओळख व त्यांचे महत्व समजावे यासाठी आश्रमशाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले. केवळ भाज्याच नाही तर त्यांची पाककृतीही करून दाखवण्यात आली. यानिमित्ताने परिसरातील नागरिकांना रानभाज्यांची चव चाखता आली. याप्रसंगी प्राचार्य सुभाष दळवी , प्रा. राजेंद्र चव्हाण ,प्रा. लक्ष्मण भुरभुडे , प्रा. राजेंद्र पवार, निलेश बुवा ,श्रीमती. जयवंती जाधव व श्रीमती. निता कुवर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते....या आहेत उपयुक्त रानभाज्याकुरडू,वासत्या, झार- झुरा,चाईचा मोहर, माठ, रानवांगी, अळूकंद, रानकांदा, कवळी, टेहरा, अंबाडी, खुरसाणी, भोकर, भजेवेल, करटूले,वाथरटा कडूकंद, आळींब आदी रानात सहजरित्या उपलब्ध होणा-या मात्र आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या या भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
पेठ आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:08 PM
खवय्यांना पर्वणी : पोषण आहार अभियान
ठळक मुद्दे कृत्रिम रित्या बाजारात येणा-या भाज्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना आदिवासी भागातील रानावनात नैसर्गिकरित्या तयार होणा-या अनेक भाज्या आयुर्वेदिक दृष्टया रामबाण समजल्या जात आहेत