सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कामाला वेग
सिन्नर : सिन्नर-शिर्डी या रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याने साईभक्तांची सोय होणार आहे. या मार्गाबरोबरच पायी पदयात्रेकरूंसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या रस्त्याच्या काम प्रगतिपथावर असून, पुलांच्या कामांनीही वेग घेतल्याचे चित्र आहे. दीड वर्षात हा रस्ता पूर्ण करण्याचा मानस आहे.
शेतकरी संघटनेचे आवाहन
सिन्नर : दिल्लीतील किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. या भारत बंदमध्ये राज्यातील शेतकरी सहभागी होणार असून, शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दिघोळे यांनी केले आहे.
बनावट कारखाना उदध्वस्त
सिन्नर: मुसळगावच्या औद्योगिक वसाहतीत यशोधन केमिकल्स कारखान्यावर कृषी सहसंचालक विभागाच्या रासायनिक खते, कीटकनाशक बियाणे विभागाच्या गुणवत्ता नियंत्रकांनी छापा टाकून बनावट निवान (डायक्लोरस) कीटकनाशक तयार करणारा काराखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ५०० मिलीच्या १००, २५० मिलीच्या १२०, तर एक लिटर क्षमतेच्या ५० बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तळ्यात बुडून एकाचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील मापारवाडी शिवारात भैरवनाथ मंदिर परिसरातील तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या परप्रांतीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास योगेश यादवराव सांगडे (२२, रा. तडगुर, ता. मदनूर, जि. निजामाबाद (तेलंगणा) हा आंघोळीसाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पर्यटक व भाविकांची संख्या वाढली
सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी व शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. सिन्नर-शिर्डी रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली असून, शिर्डीसह शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर गुजरात राज्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे सिन्नर-शिर्डी रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे.