सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
यंदा ८०३ मिमी इतका पाऊस झाल्याने जलपातळीही झपाट्याने सुधारण्यास मदत झाली. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ठाणगाव, चास, नळवाडी, कोनांबे, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे या परिसरात भूजल पातळी टिकून आहे. वावी, पंचाळे, शहा टंचाईग्रस्त मानल्या जाणाऱ्या या परिसरातही भूजल पातळी समाधानकारक असल्याने रब्बीखालील क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची एकूण चौदा हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १,५६८, मका १,७६८ तर हरभऱ्याची तीन हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाच्या क्षेत्रात यंदा ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारीचेही क्षेत्र दीडशे हेक्टरने वाढले आहे.
तालुक्यात गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसाठी स्पर्धा होत आहे. शेतकऱ्यास यात सहभागी होता येईल. रब्बीतील पीक कापणी प्रयोगासाठी गावनिहाय समितीही गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------
३,२५२ हेक्टरवर कांदा लागवड
रब्बी कांदा लागवड यंदा ३,२५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात १,२२१ हेक्टरवर, तर वावी परिसरात १,०५२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. नायगाव, ब्राह्मणवाडे, गुळवंच, नांदूरशिंगोटे, डुबेरे, सोनांबे परिसरात कांद्याची लागवड झाली आहे.
----------------
पिकांवर दुष्परिणाम
रब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वाढला आहे. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.