ंमालेगाव : पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणावरून शिवसेना व भाजपा पदाधिकाºयांमध्ये राडाबाजीचा प्रकार घडला. इमारत लोकार्पण कार्यक्रमास आलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे माघारी परतावे लागले, तर माजी मंत्री प्रशांत हिरे समर्थकांनी पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन करून लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात बैठक घेऊन उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली.दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तीव्र विरोध केला. भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यावेळी शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाºयांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मालेगाव पंचायत समितीचा लोकार्पण सोहळा यापूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आयोजित केला होता; मात्र उद्घाटनाच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेची पंचायत समितीवर सत्ता होती. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर भाजपा व राष्टÑवादीचे पंचायत समितीवर सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने इमारत लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे व जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांना निमंत्रित करण्यात आले होते. दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाआधीच शिवसेनेचे विनोद वाघ, दत्ता चौधरी, उमेश अहिरे, भूषण बच्छाव, चंदू पठाडे, गणेश पाटील, मनोज बच्छाव, यशपाल बागुल, गोपी वडनेरे, राहुल बच्छाव, गणेश गोºहे, संजय भुसे आदींसह पदाधिकाºयांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी सुरू केली, तर पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य सरलाबाई शेळके, भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, मनीषा सोनवणे, शंकर बोरसे, बकूबाई पवार तसेच पदाधिकारी भारत सोनवणे, कृष्णा ठाकरे आदिंनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पायºयांवर पंगत मांडून जेवण केले. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे, खासदार भामरे व मान्यवरांनी मुख्य लोकार्पण सोहळ्याकडे येण्याचे टाळले. लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना व भाजपा समर्थकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन माजी मंत्री हिरे यांचे समर्थक व भाजपाचे पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, विकी खैरनार, अमोल शिंदे, पवन ठाकरे यांच्यासह पदाधिकाºयांनी पंचायत समितीत प्रवेश करत सभागृहात उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक सावकार व राज्य राखीव दलाच्या जवानांनी गोंधळ घालणाºया भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यानंतरही एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच होती. भाजपाने आयोजित केलेल्या दाभाडी येथील मेळाव्याकडे पदाधिकारी गेल्यामुळे या वादावर तब्बल पाच तासानंतर पडदा पडला.
सेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:02 PM