नाशिक - सुजय विखे यांच्यापाठोपाठ त्यांच्या वडील आणि विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांमुळे राष्टÑवादी आणि कॉँग्रेस महाआघाडीच्या बॅनरवरून त्यांची छबी गायब करण्यात आली आहे. नाशिकमध्येशरद पवार यांच्या सभेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. दरम्यान, प्रचार सभेच्या ठिकाणी अनेक पोस्टरवर शरद पवार आणि त्यांच्या जोडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र झळकत आहेत.
राष्टÑवादीच्या प्रचारासाठी नाशिक तालुक्यातील सिध्दप्रिंपी येथे शरद पवार यांची आज सभा असून याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या छायाचित्रांमधून विखे पाटील यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. राष्टÑवादीचे डी. पी. त्रिपाठी, कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मनसे उपाध्यक्ष राहुल ढिकले देखील सभेस उपस्थित आहेत.
अहमदनगर मध्ये सुजय विखे यांच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरूवातील आपण या मतदार संघात प्रचाराला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु त्यांनतर त्यांच्याच प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, सुजय विखे यांना राष्टÑवादीकडून विरोध झाल्यानंतर जेव्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांनी विखे यांना पराभूत करता येत नाही असे सांगताना बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी झालेल्या वादाचा मुद्दा बाहेर काढला होता. पवार यांच्या मनातील सल यानिमित्ताने बाहेर आल्याने देखील नाशिकमधील कार्यकर्त्यांनी विखे यांचा फोटो व्यासपीठावरील बॅनरमधून गायब केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, याच व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र नसले तरी सभेच्या परीसरात मनसेचे झेंडे तसेच राज ठाकरे आणि शरद पवार यांचे फोटो एकाच बॅनरवर आहेत.