न्यायडोंगरी : वैशाख महिन्याची सोमवती अमावास्या व शनी जयंती हा दुर्मीळ योग आल्याने नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे शनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावत मोठी गर्दी केली होती. शैनेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने परिसर दणाणून गेला होता.
यावेळी शनी महाराज मूर्तीचा अभिषेक व महापूजा, आरती न्यायडोंगरी येथील भारत पेट्रोल पंपचे संचालक ज्ञानदेव गंगाधर आहेर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, सचिव माजी आमदार अनिल आहेर, विश्वस्त विजय चोपडा, खासेराव सुर्वे, तसेच मान्यवर उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमात तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन झाले. त्यात हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याही कीर्तनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
नस्तनपूर हे शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ म्हणून ओळखले जाते. शनी अमावास्या आणि शनी जयंतीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. नस्तनपूर येथील स्थापित शनी देवाचे मंदिर अतिशय पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. प्रभू श्रीरामाने त्याची स्थापना केलेली असल्याने या ठिकाणाला अतिशय महत्त्व असून शनी अमावास्या आणि शनी जयंतीला दूरवरून भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात.