नाशिक : प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ निमित्त होते रामकृष्ण मिरजकर आणि प्रमिलाबाई मिरजकर यांच्या २४ व्या स्मृती समारोहाचे़ दोनदिवसीय या समारोहाची सांगता पंडित पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली़गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमात रविवारी (दि़२३) प्रसिध्द गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला़ या कार्यक्राची सुरुवात पंडितजींनी पुरीया धनाश्री रागातील बडा ख्याल ‘कैसे दिन बिते’ने झाली़ यानंतर सादर केलेल्या याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ला रसिकांनी उत्फूर्त दाद दिली़ या मैफलीस तबल्यावर भरत कामत, ज्ञानेश्वर सोनवणे (संवादिनी), विनोद कुलकर्णी आणि वैष्णवी नवघरे (तानपुरा), सागर मोराजकर (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली तर ध्वनी संयोजन भगवान खानझोडे यांनी केले. राजा पुंडलिक यांनी परिचय करून दिला़ धनेश जोशी यांनीे सूत्रसंचालन केले.हंसध्वनी रागातील भजन ‘अहो नारायणा सांभाळावे आम्हा..’ अभंग ‘कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान’, कवी कुसुमाग्रज यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकांतील ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’ हे यमन रागातील नाट्यपद आणि त्यानंतर वसंत कानेटकर लिखित मत्स्यगंधा या नाटकातील ‘गुंतता हृदय हे’ नाट्यपद सादर केले़ उत्तरोत्तर ही मैफल चांगलीच रंगत गेली़
रघुनंदन पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:23 AM