नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य साथीने ग्रासलेल्या जगाला एप्रिल महिना दिलासादायक आनंदवार्ता घेऊन येणार आहे. एप्रिल महिन्यात ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत ज्योतिष तज्ज्ञांनी दिले आहेत.
अनेकांच्या आयुष्यातील राहू-केतुचे शुक्लकाष्ठ संपणार असून राजकारणातही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: ७ एप्रिल रोजी मंगळ बदलत असल्याने शनि व मंगळाची कोंडी सुटणार असून अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असल्याचे मत नाशिक येथील ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एक नव्हे तर ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ही एक अद्भुत खगोलीय घटना मानली जात असून त्याविषयी ज्याेतिषतज्ज्ञांनी चांगल्या परिणामांचे संकेत दिले आहेत. याबाबत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी सांगितले, राहू हा १६ मार्च रोजीच बदलला आहे. राहू व केतू हे एकाचवेळी बदलत असतात. तर रवी, बुध, शुक्र हे दर महिन्याला बदलतात. आता एप्रिल महिन्यात मंगळ व गुरू या ग्रहांचे राशी परिवर्तन होत असून त्यामुळे अनेक सकारात्मक बदल पाहावयास मिळणार आहेत. ७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह बदलणार आहे तर गुरू हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने बदल पाहावयास मिळणार आहेत. शनि व मंगळ हे दोन शत्रू आहेत. त्यांची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे वैयक्तिक मानवी जीवनापासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषि, शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल स्थिती बघायला मिळणार आहे.