वणी : तोतयागिरी करून आमदार असल्याचे भासवत फसवणूक व बनावटीकरण करणाऱ्या राहुल आहेर याची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी बनावटीकरण करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या राहुल आहेर याची मंगळवारी (दि.७) न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा पाठपुरावा लोकमतने सुरू ठेवला असून अनेक बाबींची उकल केली आहे.विशेष म्हणजे दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील असलेला राहुल आहेर याची उच्चपदस्थ राजकीय व्यक्तींची घनिष्ठता छायाचित्रात पाहिली तर मानसन्मान, प्रतिष्ठा प्राप्तीतून अर्थकेंद्र चालविण्याची धुंदी तपास यंत्रणेने उतरविली आहे. गेल्या २९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या तपास कालावधीत आजपावेतो पुढे आलेल्या घटनांचा तपशीलवार ऊहापोह लक्षात घेता सर्वसामान्यांची जिज्ञासा या प्रकरणात वाढली आहे.दरम्यान, राहुल आहेर याला मंगळवारी (दि.७) न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद व आवश्यक ग्राह्य पुरावे तसेच वास्तविकता जाणून घेत राहुल आहेर याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.राहुल यांच्या बाजूने जामिनासाठी प्रयत्न केला. न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर करत राहुलची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. घटना, तपास कालावधी यात पोलिसांनी आवश्यक पुरावे संकलित केले असून लवकरच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (०७ राहुल आहेर)