मालेगाव मध्य : तालुक्यातील चंदनपुरी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक भुऱ्या यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक प्रवीण शंकर सानप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी बाराच्या सुमारास चंदनपुरी गावात टाईम मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी मटका जुगार चालविणारा आनंदा भगवान सोनवणे रा.नगाव, चंदनपुरी याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक रफिक भुऱ्या, रा. आझादनगर, मालेगाव याच्यासह चार इसमांवर किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनपुरीत जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:20 IST