मकरसंक्रांतीनिमित्त शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली असून, यासाठी नायलॉन मांजाचाही वापर सर्रासपणे होत आहे; मात्र हा नायलॉन मांजा मानवी जीवितास तसेच पर्यावरणासाठी हानीकारक ठरणारा असल्याने यावर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी निर्बंध आणले आहे. याबाबत अधिसूचनाही काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली. चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची होणारी विक्री रोखण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२ आणि मध्यवर्ती शाखेलासुद्धा गोपनीय पद्धतीने माहिती काढून अवैधरीत्या नायलॉन मांजा शहरात जर कोणी विक्री करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने धडक मोहीम हाती घेतली. साध्या वेशात शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन तपासणी केली असता, पंचवटी आणि जुने नाशिक भागात बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. पहिला छापा पंचवटीतील पेठरोडवरील प्रवीण किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात पोलिसांनी टाकला. तेथून सुमारे २९ हजार ३०० रुपयांचे ६५ गट्टू जप्त करण्यात आले. दुकानचालक संशयित प्रशांत लक्ष्मण दिंडे (३२,रा.तवलीफाटा) विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा (१९८६) कलम-५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास जप्त केलेल्या नायलॉन मांजाच्या गट्टूंसह पंचवटी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये जुन्या नाशकातील मुलतानपुरा या भागात पोलिसांनी विक्रेता संशयित दानिश इसहाक अत्तार (२०) याच्या ताब्यातून ६ हजार ५०० रुपये किमतीचे १३ गट्टू जप्त केले. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात पर्यावरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी ३५ हजार ८०० रुपये किमतीचे सुमारे ७८ नग नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहे.
--इन्फो--
सातपूरमध्येही पोलिसांचा छापा
सातपूर कॉलनीतील आनंदछाया बसस्टॉपजवळील एका दुकानात बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित विशाल जगन्नाथ चौधरी याच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करत नायलॉन मांजा जप्त केला. मागील दोन दिवसांत परिमंडळ-२ मध्ये तसेच परिमंडळ-१ मध्येही पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.