लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटीच्या मुख्यशाखेसह जिल्ह्यातील नऊ शाखा व चेअरमन सतीश काळे यांच्या टाळकी विंचूर येथील घरी पोलिसांनी एकाच वेळी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभरात १७० शाखांचे जाळे असलेल्या पतसंस्थेने युवकांना नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने ठेवी संकलित करून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. लासलगाव पोलिसांत शनिवारी तक्र ार दाखल झाली आहे.रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथे शाळेत शिक्षक असलेले काळे यांनी हरिओम ग्रुपची स्थापना केली. त्यात त्यांनी प्लॉट खरेदी विक्र ीचे व्यवहार सुरू केले. या गु्रपच्या माध्यमातून व्यवहार केले. अनेक ग्राहकांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही तसेच विलंबाने मिळत होती; मात्र याबाबत तक्रार नव्हती. म्हणून काळे यांनी ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीची स्थापना करून जिल्ह्यात १७० पेक्षा जादा शाखांची निर्मिती केली. सोसायटीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी ठरावीक रक्कम ठेवीच्या स्वरूपात युवकांकडून घेतली. पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी घेतल्याचे समजते. अनेक युवकांमध्ये चिंंतेचे वातावरण आहे. लासलगाव येथील मुख्य कार्यालयासह कळवण, नांदगाव, मनमाड, घोटी, नाशिक शहर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी शाखांवर पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत संगणक संच, कागदपत्रे, फायली, पेनड्राइव्ह व इतर आवश्यक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस काळे यांचा शोध घेत असल्याचे लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.