नाशिक : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करायची कोणी? याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यानंतर शहर पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी धाडसत्र राबवून बेकायदेशीरपणे जुगार चालणारे, मद्यविक्रीचे अड्डे उद्ध्वस्त केले. एकूण २४ गुन्ह्यांमध्ये सुमारे ५१ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानंतर शहरातील परिमंडल-१ व २च्या हद्दीत अवैधरीत्या दारू, जुगार, मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी अचानकपणे बुधवारी मध्यरात्री जोरदार धाडी टाकल्या. उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांच्या नेतृत्वाखाली आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, मुंबई नाका, गंगापूर, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह गुन्हेशाेध पथकांनी आपापल्या हद्दीत अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यांचा शोध घेत कारवाई केली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये कारवाई करत शहरातील २४ अवैध धंद्यांवर टाच आणली. यावेळी जुगार खेळताना व मद्यविक्री करताना आढळून आलेल्या संशयितांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये ६३ हजारांचा मद्यसाठा, जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये ३८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच सिगारेट, तंबाखू उत्पादने अधिनियम २००३सह सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सुधारणा नियम २०१४ नुसार ७६०० रुपये किमतीचा तंबाखू, सिगारेटचा बेकायदेशीर मालाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.शहरातील अवैध दारूविक्रीचे अड्डे असो किंवा जुगार अड्डे असो हे कायमस्वरूपी बंद व्हावे, अशीच नाशिककरांची अपेक्षा आहे. अवैध धंद्यांविरोधी पोलिसांनी पुन्हा मोहीम हाती घेतली असली तरी ही मोहीम कायम सुरू रहावी आणि महसूल, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यंत्रणेनेही परवाने तपासावे, तसेच जुगार अड्ड्यांबाबतही तपासणी महसूलच्या संबंधित लॉटरी विभागाकडून करण्याची मागणी होत आहे.
शहरातील अवैध मद्य, जुगार अड्ड्यांवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:32 AM
नाशिक : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करायची कोणी? याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यानंतर शहर पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. ...
ठळक मुद्देपोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये : ५१ संशयितांविरुद्ध गुन्हे; ६३ हजारांचा मद्यसाठा जप्त