नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करणाऱ्या राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध खात्यांना कार्यप्रवण करण्यासाठी दर आठवड्यात बैठका घेऊन आढावा घेतला जात असला, तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रेल्वे व पुरातत्व खात्यांची चाल कासवगतीने सुरू असल्याचे मंगळवारच्या बैठकीत निदर्शनास आले. जिल्हाधिकारी कार्यालयात मेळा अधिकारी महेश पाटील व उदय किसवे यांच्या उपस्थितीत साप्ताहिक बैठक घेण्यात आली. गेल्या बैठकीत चर्चिल्या गेलेल्या विषयानुरूप माहिती घेताना, वीज वितरण कंपनीने तपोवन व साधुग्राम भागात भूमिगत तार टाकणे व उपकेंद्र निर्मितीबाबत निविदा प्रक्रिया राबविली आहे. या निविदेला वीज कंपनीच्या मुख्यालयाने मंजुरी दिल्याने येत्या आठवडाभरात सदरची कामे सुरू केली जातील असे सांगण्यात आले. अन्य खात्यांची ठरवून दिलेल्या नियोजनानुसार वाटचाल सुरू असल्याचे आढावादरम्यान सांगण्यात आले. सिंहस्थकामे मुदतीत पूर्ण व्हावीत यासाठी दैनंदिन कामाची प्रगती आॅनलाइन भरण्यासाठी सिंहस्थ कक्षाने ‘वर्क मॉनिटरिंग’ सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याचे सादरीकरणही या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर यापुढे दररोज त्यात माहिती भरण्याच्या सूचनाही संबंधितांना करण्यात आल्या. राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्वच खात्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत अंग झटकून तयारी सुरू केली असताना, केंद्र सरकारच्या अखत्यारितील खात्यांची वाटचाल मात्र कासवगतीने होते आहे. त्यातही महत्त्वाच्या ठरणाऱ्या रेल्वे विभागाने अद्यापही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचे नियोजन केले नसल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले.राज्य सरकारने रेल्वे विभागाला निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही पाहिजे त्या प्रमाणात कामात प्रगती नसल्याचे दिसते. पुरातत्व खात्यानेही त्र्यंबकेश्वर येथील मंदिराची डागडुजी करण्याबाबतचा प्रस्ताव पुरातत्व खात्याच्या औरंगाबाद येथील कार्यालयाकडे पाठविला आहे. परंतु तेथून अनुमती मिळत नसल्याने काम करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पाठपुरावा करून तातडीने मंजुरी मिळवून आणण्याच्या सूचना करण्यात आल्या.
रेल्वे, पुरातत्व विभाग नियोजनात मागे
By admin | Published: July 22, 2014 10:55 PM