नाशिकरोड : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे नाशिकमधून धावणाऱ्या रेल्वेगाड्या ब्लॉक झाल्या आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारीही अनेक गाड्या रद्द करण्याची वेळ आली. नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी तसेच सेवाग्राम, देवगिरी एक्स्प्रेस, जनशताब्दी, अमरावती या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या तर सोमवारी (ता. १९) पंचवटी, हटिया या गाड्या धावणार नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. दरम्यान, सोमवारीदेखील पावसामुळे अन्य काही गाड्याही रद्द होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री मेाठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस सुरू झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर दोन, लासलगाव, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकात प्रत्येकी एक याप्रमाणे पाच गाड्या जिल्ह्यात रोखून धरण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांचे हाल झाले. सोमवारीदेखील पंचवटीने मुंबईला नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नाशिककरांचे हाल होण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई-नांदेड राज्यराणी, मुंबई-जबलपूर गरीब रथ, मुंबई-नागपूर, मुंबई-आदिलाबाद, मुंबई-गोंदिया, मुंबई-सिकंदराबाद, -अमरावती या गाड्या रद्द करण्याची वेळ आली. मुसळधार पावसामुळे रविवारी अनेक गाड्यांना मोठा विलंबदेखील झाला. नागपूरहून मुंबईला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस ही रविवारी पहाटे तीनला नाशिकरोडपर्यंतच धावली. तेथून मुंबईला न जाता ती नागपूरला परत गेली. महानगरी बारा तास, तपोवन पाच तास, गीतांजली, मुंबई-हावडा व तुलसी आठ तास, पुष्पक, भागलपूर व कामाख्या एक्स्प्रेस सहा तास, काशी दहा तास, गोदान चार तास, पवन दहा तास, कामायानी दोन तास विलंबाने धावत होत्या. एर्नाकुलम ते निजामुद्दीन धावणारी मंगला एक्स्प्रेस ही नाशिकरोडमार्गे न जाता शोरलूड जंक्शन येथून तिचा मार्ग बदलून इटारसी- बीनामार्ग ती पुढे सोडण्यात आली. शनिवारीही गाड्यांना उशीर झाला होता. रविवारी सायंकाळी मुंबईहून नाशिकरोडला येणाऱ्या काही गाड्या रद्द होणार की विलंबाने धावणार हे निश्चित नव्हते. पावसामुळे रेल्वे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकात व बाहेरही आवारात प्रवाशांची गर्दी झाली होती.
---इन्फो--
एस.टी. आली धावून
नाशिक : नाशिक जिल्ह्यात अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीची बस धावून आली. मनमाड, लासलगाव, नाशिकरोड तसेच देवळाली कॅम्प येथे थांबलेल्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोडण्यात आलेल्या या बसला प्रवाशांचा प्रतिसादही लाभला. ज्यांना मुंबई गाठणे आवश्यक होते अशा प्रवाशांनी पुढील प्रवास बसने केला. लासलगावमधील अनेक प्रवासी नाशिकमध्येदेखील उतरले. लासलगाव आगारातून ठाण्यासाठी एक, कल्याणसाठी दोन तर नाशिकसाठी तीन बसेस सोडण्यात आल्या होत्या. नाशिकरोड बसस्थानकातून ठाणे व कल्याणसाठी प्रत्येकी एक एसटी बस सोडण्यात आली. मनमाड आणि देवळाली कॅम्प अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या गाडीची व्यवस्था केल्याने उशिरा त्यांनी रेल्वे गाडीतूनच प्रवास केला.
मागीलवर्षीदेखील रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठीसाठी एस.टी. धावली होती. रेल्वेच्या तिकीटावर इगतपुरीत अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना एस.टी बसने मुंबईत पोहचविण्यात आले होते. दरम्यान, मुंबईतील पावसाची शक्यता लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बसेस सज्ज ठेवाव्यात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.