नाशिकरोड : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले. केरळमध्ये अतिवृष्टी व पावसाच्या पुरामुळे फार वाताहत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील एका मंगल कार्यालयात सर्व प्रकारची मदत गोळा करण्यात येत होती. अन्नधान्य, पाण्याच्या बाटलीचे बॉक्स, पाणी उपसा करणारे २५ पंप, कपडे आदी विविध प्रकारच्या जमा झालेल्या वस्तू, साहित्य तीन ट्रकमधून बुधवारी सायंकाळी रेल्वे माल धक्क्यावर आणण्यात आले. तेथून मालट्रकमधील सामान रेल्वे वाहतुकीच्या दोन व्हीपीमधून लागलीच मुंबईला रवाना करण्यात आले. केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यात येणारी मदत रेल्वे प्रशासनामार्फत मोफत पाठविण्यात येत आहे. नाशिकरोड वाणिज्य विभागाचे निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी केरळ पूरग्रस्तांना सामान पाठविण्यासाठी तातडीने दोन व्हीपी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशन नाशिकचे संस्थापक रणजित नायर, अध्यक्ष के.पी. कोशी, जॉर्जी पी. जॉन, दिनो मॅथ्यु, शिनु जोस, उत्तम पिल्ले, राईटसन् बर्नाल्ड, अर्जुन नायर, सुरेन्द्र नायर, रमय्या नायर, रश्मी नायर, वलंसरा नायर, एलिझाबेथ सत्येन, आशा बाबू, डिन्सी बाबू, राधा मोहन, शिवनारायण सोमाणी, कैलास भालेराव आदी उपस्थित होते.माथाडी कामगारांची मदतकेरळ पूरग्रस्तांना विविध संस्था, संघटना, समाजाकडून गोळा होणारी मदत ट्रक, टेम्पोमधून रेल्वे माल धक्क्यावर आल्यानंतर माथाडी कामगारांनीदेखील कुठलेही पैसे न घेता सदर माल, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये मोफत व्यवस्थित रचून भरून दिला. विशेष यापूर्वी गेलेल्या सातही व्हीपी या मध्यरात्री रेल्वे माल धक्क्यावर आल्यावर झोपेतून उठून माथाडी कामगारांनी रातोरात ट्रक, टेम्पोमधील सामान, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये भरून केरळ पूरग्रस्तांना मदत केली आहे.
मल्याळी असोसिएशनतर्फे रेल्वेद्वारे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:50 AM