सिंहस्थ कुंभमेळा : शेड, प्लॅटफॉर्मची रंगरंगोटीनाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीनिमित्त गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला रेल्वे मालधक्का पुन्हा पूर्ववत सुरू झाला आहे. पर्वणीनिमित्त मालधक्का शेड व प्लॅटफॉर्मची केलेली दुरुस्ती, रंगरंगोटीमुळे माथाडी कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. कुंभमेळ्याच्या पर्वणीनिमित्त आॅगस्ट महिन्यापासून रेल्वे मालधक्का पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पर्वणीत येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे मालधक्का शेड व प्लॅटफॉर्मची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच ट्यूब लाईट, पंखे, कॉँक्रिटीकरण, प्लॅटफॉर्मचे सपाटीकरण, लोखंडी जिने बसविण्यात आले होते. जवळपास दीड महिना मालधक्का बंद राहिल्याने प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मालधक्का बंद राहिल्याने माथाडी कामगार, हमाल, वाहनचालक यांचा रोजीरोटीचादेखील प्रश्न निर्माण झाला होता. दीड-दोन महिन्यांपासून बंद असलेला रेल्वे मालधक्का बुधवारी दुपारनंतर पुन्हा पूर्ववत कार्यरत झाला. एफसीआयचा गव्हाचा रॅक आल्यानंतर माथाडी कामगार लागलीच कामावर हजर होऊन रॅक खाली केला. तर गुरुवारी अंबुजा व एसीसी कंपनीचे सीमेंटचे रॅक आल्याने मालधक्का पुन्हा माथाडी कामगार व वाहनांच्या वर्दळीने फुलून गेला होता. पर्वणीनिमित्त मालधक्क्यावर निर्माण करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा माथाडी कामगारांना काम करताना मदत व फायदा होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे मालधक्का सुरू
By admin | Published: October 02, 2015 12:10 AM