नाशिकरोड : गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.सहा दिवसांपूर्वी नागपूरहून मुंबईला जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला होता. वाशिंद आणि आसनगाव दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणचे हानी झालेले रुळ बदलण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाºया मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाºया गाड्या वाशिंदजवळ येताच डाऊनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किमी गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. सिंगल लाईनचा हा धोका पत्करल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या सुरू झाल्या. आता सर्वच वाहतूक सुरळीत झाली आहे. पंचवटी व अन्य गाड्या सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यराणी पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यराणी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी जोर लावल्याने तीही आजपासून सुरू झाली. दोन्ही मार्ग खुले झाल्याने ही गाडी आज मुंबईला रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना पहाटे भुसावळ-पुणे गाडी आहे. ती पाच दिवस दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात येत होती. आजपासून ही गाडीदेखील नाशिकमार्गे धाऊ लागल्याने पुण्याला जाणाºया नाशिककरांची गैरसोय दूर झाली आहे.
रेल्वे वाहतूक अखेर पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 11:54 PM