नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. रविवारी रात्री नऊ वाजेपासूनच पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, गोदावरीच्या पातळीतदेखील घट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.हवामान खात्याकडून रविवारी दिवसभर जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पहाटेपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरीलाही पूरसदृश परिस्थिती पहावयास मिळाली. हंगामात गोदावरी नदी पहिल्यांदाच खळाळून वाहताना नाशिककरांनी बघितली. पावसाळी गटारी, नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत मिसळत असल्याचे बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत गटारी, नाल्यांच्या पाण्यामुळे जास्त वाढ झाली. पावसाळी नाले तुडुंब भरून रस्त्यावरून वाहू लागले होते. दरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वच्छता विभागाकडून सोमवारी सकाळी ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला साचलेला गाळ स्वच्छ केला जात होता. तसेच पावसाळी गटारींच्या चेंबरच्या दुरुस्तीचीही कामे हाती घेण्यात आली होती. ठिकठिकाणी कोसळलेल्या झाडांच्या फांद्याही उचलून घेण्यात आल्या. सोमवारी दिवसभर पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले.गंगापूरचा साठा ३५ टक्क्यांवरशहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात गंगापूर क्षेत्रात केवळ ३० मि.मी. इतका पाऊस पडला. धरणात दिवसभरात केवळ ६२ दलघफू इतक्या नवीन पाण्याची आवक झाली. अद्याप १ हजार ४९ दलघफू नवीन पाण्याची आवक धरणात झाल्याने पाणीसाठा १ हजार ९६८ दलघफूपर्यंत पोहचला आहे. धरण ३५ टक्के भरले असून, सोमवारी पाणलोट क्षेत्रातील गौतमीच्या परिसरात १५, कश्यपी भागात २३, त्र्यंबकमध्ये ५५ तर अंबोलीत ६९ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. गौतमी २१.२९ टक्के , कश्यपी २४.४६ टक्के भरले.दिवसभरात ढग दाटून येत असले तरीदेखील हलक्या स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होत होता. पावसाने जोर धरला नाही. बाजारपेठेतही गर्दी पहावयास मिळाली. पावसाची रिमझिम सुरू असली तरीदेखील मुंबई नाका, द्वारका, काठेगल्ली, कॅनडा कॉर्नर या भागात वाहतूक कोंडी झाली होती.
शहर व परिसरात पावसाचा जोर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:30 AM