नाशिक : जून महिना उलटूनही केवळ नाशिक जिल्ह्यात दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार हजेरी लावण्यासाठी सोमवारी (दि.२७) रामकुंडावरील बाणेश्वर मंदिरात गंगा गोदावरी पुरोहित संघ व आदिवासी जीवरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेश्वराला साकडे घालण्यात आले असून, शिवलिंग पाण्याखाली ठेवण्यात आले आहे. म्हणजेच जलाधिवास करण्यात आला आहे.यंदा नाशिककरांना कधी नव्हे एवढ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागले आहे. राज्यात अन्यत्र पावसाला सुरूवात झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे बाणेश्वराला साकडे घालण्यात आले आहे. यावेळी बाणेश्वराला रामकुंडातील पाणी टाकून संपूर्णपूणे पाण्याखाली ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी गंगा गोदावरी पुरोहित संघ व आदिवासी जीवरक्षक दल यांचे पदाधिकारी सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, आलोक गायधनी, राजाभाऊ गायधनी, सदानंद देव आदिंसह कपालेश्वर भक्त मंडळींनी बाणेश्वर मंदिरात गणपती पूजन, पुण्यवाचन, नंतर रुद्राभिषेक आदि पूजापाठ करण्यात येऊस बाणेश्वराची मूर्ती रामकुंडातील पाण्याने बुडविण्यात आली. मंदिराच्या सभोवताली काटेरी झुडपे लावून पांढरे पडदे लावण्यात आले. यापूर्वी आॅगस्ट २००८ मध्ये असाच बाणेश्वराला जलाधिवास करण्यात आल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत गोदावरीला महापूर आला होता. आताही पावसाने नाशिककडे पाठ फिरविल्याने आणि जून महिना उलटत आला तरी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने नाशिककर चिंतित आहेत. दिवसातून एकवेळा पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दमदार पाऊस झाल्यास ही पाणीकपात बंद होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)जून महिना संपत आल्याने पावसासाठी आसुसलेल्या नाशिककरांची तगमग वाढली आहे. आता थेट सृष्टीकर्त्यालाच साकडे घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पर्जन्यवृष्टीसाठी नाशिकमध्ये पवित्र रामकुंड येथील ‘बाणेश्वराला’च असे पाण्यात ठेवण्यात आले आहे. पाऊस पडेपर्यंत देवाला जलाधिवासातच ठेवले जाणार आहे.
पर्जन्यासाठी ‘बाणेश्वराला’ जलाधिवास
By admin | Published: June 28, 2016 12:14 AM