नाशिक : जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आणि आतापर्यंत सरासरी १७० मि.मी. म्हणजे सुमारे १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात अवघा एक टक्का वाढ झाली असून शनिवारी (दि.६) सुरू होणा-या पुनर्वसू नक्षत्राकडे आता बळीराजा मोठ्या आशेने बघत आहे.नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत १८८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी १२.६ टक्के आहे. आतापर्यंत महिनाभरात जिल्ह्यात सरासरी १७०.४७ मि.मी. पावसाची नोंद होऊन त्याची टक्केवारी १६.८२ टक्के इतकी राहिली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची टक्केवारी पाहता, नाशिक तालुक्यात ३६.२६ टक्के, इगतपुरी (१९.३०), दिंडोरी (१०.९२), पेठ (२४.६५), त्र्यंबकेश्वर (५.८३), मालेगाव (२६.०९), नांदगाव (१०.०६), चांदवड (६.५६), कळवण (२.२६), बागलाण (२२.१९), सुरगाणा (१५.४३), देवळा (५.३८), निफाड (१३.३१), सिन्नर (१६.८६) आणि येवला (४७.०६) याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, निफाड या तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापावेतो १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. महिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे. अद्यापही जिल्ह्यातील १२ धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे.
जिल्ह्यात पाऊस; धरणसाठा अत्यल्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 6:09 PM
आतापर्यंत १६ टक्के पाऊस : बारा धरणांत अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा
ठळक मुद्देमहिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे.