नाशिक : जून ते सप्टेंबर असे चार महिने चालणारा शासकीय दप्तरातील पावसाळा शुक्रवारी संपुष्टात आला असून, यंदा २०१३नंतर पहिल्यांदाच समाधानकारक म्हणजे ९७ टक्के पाऊस जिल्ह्यात नोंदविला गेला आहे. आॅक्टोबरमध्ये पडणारा पाऊस शासनाच्या लेखी अवकाळी असणार आहे. ब्रिटिशपद्धतीनुसार पावसाचा हंगाम चार महिन्यांचा म्हणजेच जून ते सप्टेंबर असाच पारंपरिक धरण्यात येत असल्यामुळे दरवर्षी सप्टेंबरअखेर पाऊस थांबल्याचे मानले जात असले तरी, गेल्या दोन वर्षांपासून पावसाची वक्रदृष्टी पाहता १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय दप्तरात पाऊस मोजला जात होता. यंदा मात्र ३० सप्टेंबर रोजीच शासनाचे दप्तर पाऊस नोंदीसाठी बंद झाले आहे. यंदा जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६.५३ टक्के इतका पाऊस नोंदविला गेला आहे, म्हणजेच वर्षाकाठी १६११७ मिली मीटर पाऊस होणे अपेक्षित असताना ३० सप्टेंबर अखेर १५५५७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात नाशिक, दिंडोरी, बागलाण, निफाड, सिन्नर या पाच तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसामुळे खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या होऊन शेती उत्पादन वाढण्याची शक्यता निर्माण झाली, तर जिल्ह्णातील धरणसाठाही ८६ टक्के इतका झाला. समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीलाही फायदा होणार आहे. शुक्रवारी शासकीय दप्तरात पाऊस बंद झाल्यानंतर यापुढे पडणारा पाऊस अवकाळी म्हणून समजला जाणार आहे.
शासकीय दप्तरात पाऊस बंद
By admin | Published: October 01, 2016 1:51 AM