नाशिक - गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली होती मात्र आज सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नाशिककरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरण क्षेत्रामध्ये काही दिवस शिल्लक राहिल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. मात्र आजच्या या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांना आनंद झाला आहे. दरम्यान सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत साधारणपणे 18 मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शहराबरोबरच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बळीराजाला दमदार पावसाची आस लागून राहिली आहे. पावसाळापूर्व शेतीची कामे पूर्ण झाली असून सध्यस्थीत शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेशवर आणि इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत 301 मिमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर इगतपुरीतही पावसाची संततधार सुरू असल्याने भात पिकांच्या आवणीला वेग आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणारे छोटे मोठे धबधबे पर्यटकांच्या गर्दीने खुलून जाणार आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरवात झाली आहे. त्र्यंबकेश्वरसह आंबोली घाटात कोसळधार नसली तरी थोड्या प्रमाणात पावसाची संततधार सुरूच आहे परिणामी काल गंगापूर धरणात 150 दलघफु पाणी वाढले आहे. या पाण्यामुळे शहर वासीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गंगापूर धरण पूर्णपणे भरण्यासाठी शहरवासीयांना गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची वाट पहावी लागणार आहे.