नाशिक शहरसह डोंगरी भागात सायंकाळनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. वास्तविक नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला असताना नाशिक आणि सिन्नर तालुक्यामध्येच पावसाने धुमशान केले. नाशिक शहरात सायंकाळी ५ वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्री ९ वाजेनंतरही जोरदार सुरूच होता. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. शहरातील जुने नाशिकमधील बाजारपेठांमधील रस्त्यांवरून पाण्याचे पाट पाहत होते. सिन्नर तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह सुमारे ४ तास तुफान पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्र्यंबकेश्वरलादेखील सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ ते ६.३० या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तासभरानंतर पाऊस काहीसा कमी झाल्यानंतर रात्री नऊनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
या दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार सुरू असताना मालेगाव शहर आणि परिसरात सायंकाळी ८ वाजेपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. याउलट मालेगावत उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी पाऊस पडेल असे बोलेले जात होते. मात्र मालेगावत रात्रीपर्यंत कुठेही पाऊस झाला नाही. सटाणा तालुक्यातही सायंकाळी कुठेही पावसाची नाेंद झाली नसल्याची माहिती तेथील तहसीलदारांनी कळविली आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. पावसाचे क्षेत्र असलेल्या सुरगाण्यात गुरुवारी पाऊस बरसला नाही.
पेठ तालुक्यातील जोगमोडी मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. इतर भागात मात्र पाऊस झाल्याची कुठेही नोंद नव्हती. मागील महिन्यात दिंडोरी झोडपणाऱ्या पावसाने गुरुवारी दिंडोरीला दिलासा दिला. गुरुवारी दिवसभर दिंडोरीतील वातावरण निरभ्र राहिले. याबरोबरच चांदवड, देवळा तालुक्यांमध्ये पाऊस नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली.