नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून उष्णतेच्या झळांनी होरपळून निघणाºया नाशिककरांना पावसाने पुनरागमन करून शनिवारी थंड दिलासा दिला. सायंकाळी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून जनजीवन विस्कळीत झाले.गणेशोत्सवाच्या मध्यान्हानंतर पाऊस गायब झाल्याने हवेतील उकाडा वाढला होता. दिवसभर आॅक्टोबर हिटचा अनुभव सप्टेंबरमध्येच येत असल्याने नागरिक घामाघूम होत होते. दिवसा उष्णता व रात्री थंड हवा अशा मिश्र वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली होती. शुक्रवारी दिवसभर उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शनिवारी दिवसभर पुन्हा उष्मा कायम होता. सायंकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. शनिवारच्या सुटीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागातही पावसाचे पुनरागमन झाले. सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली, सुमारे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे वातावरणात काहीसा थंडावा निर्माण झाला असून, येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाचे पुनरागमन; नागरिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:15 AM