नाशिक : जून महिन्याच्या ७ तारखेच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर संपूर्ण महिना कोरडाठाक गेल्याने नाशिककर चिंतातुर झाले असतानाच दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकते की काय, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात होती. अखेर वरुणराजाने कृपादृष्टी केली अन् मंगळवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत रिमझिम सुरू होती. पावसाला बुधवारपासून खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात झाली. पावसामुळे सकाळी शालेय विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना रेनकोट, छत्रीचा आधार घेऊन घराबाहेर पडावे लागले. सकाळपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत कायम होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला.सोशल मीडिया ‘ओलाचिंब’सोशल मीडियावरदेखील पावसाचा ‘वर्षाव’ होत राहिला. नेटिझन्सकडून पावसाचे स्वागत अन् शुभेच्छाशी संबंधित विविध पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने सोशल मीडियाही ओलाचिंब झाला होता. एकूणच पावसाला चांगला ‘स्टार्ट’ मिळाल्याचा आनंद प्रत्येकाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.जलसाठ्यात वाढगंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, बुधवारी सकाळपर्यंत ३० मि.मी. इतक्या पावसाची नोंद पाणलोट क्षेत्रात झाली. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली.
पाऊसधारांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:58 AM