जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता; मात्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा बदलून मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने उत्तर महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होऊ लागले आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही रविवारी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळपर्यंत शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता. नागरिक दिवसभर घामाघूम झाले. दुपारच्या सुमारास अधूनमधून ढग दाटून येत होते. कमाल तापमान ३०.१अं श इतके नोंदविले गेले. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर शहरात पावसाचे वातावरण तयार होऊन दमदार सरींच्या वर्षावाला सुरुवात झाली. रविवार असल्याने शहरात फारशी वर्दळ नसल्याने अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची फारशी तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले नाही. रात्री साडेआठ वाजेपर्यंत हलक्या रिमझिम सरींचा वर्षाव शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही सुरूच होता.
--इन्फो---
बळीराजाच्या आशा पल्लवित
आठवडाभरापूर्वी शनिवारी (दि.१९) शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्री ११वाजेपर्यंत शहरात २६.६मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. मात्र रविवारपासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला होता; मात्र आठवडाभरानंतर पुन्हा सरींचा वर्षाव झाल्याने जिल्ह्यातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.