गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नाशिक रोड परिसरात रविवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक रोड परिसरात रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी तीनपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पाचपासून दमदार पावसाचे आगमन झाल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. थोड्याच वेळात पावसाने जोर धरला. यामुळे सर्वत्र थंड हवेशीर अल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. थोड्याच वेळात वीज प्रवाह सुरळीत करण्यात आला. सायंकाळी सातनंतरही पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी बारानंतर लॉकडाऊनमुळे दुकाने, व्यवसाय बंद असल्यामुळे या व्यावसायिकांची धांदल उडाली नाही. नाशिक रोड परिसरात गॅस पाइपलाइनसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. ते माती ढकलून बुजविण्यात आले असले तरी पावसामुळे माती बाहेर पडून खड्डे धोकादायक झाले आहेत. माती रस्त्यावर येऊन चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची भीती आहे. पावसाळ्याअगोदर खड्डे व्यवस्थित बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.