नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. केजरीवाल यांची कधी ‘सिंघम’, कधी ‘नायक’च्या रूपातील छायाचित्रे, शेर, कवितांची व्हॉट्स अॅप, फेसबुकवर धूम सुरू होती. यानिमित्ताने नेटकऱ्यांच्या सर्जनशीलतेचाही प्रत्यय दिवसभर आला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकत पंतप्रधान मोदींना धूळ चारली. देशातील एवढी मोठी घटना सोशल मीडियाला बरेच खाद्य पुरवून गेली. ‘आप’चा ऐतिहासिक विजय दृष्टिपथात येताच सोशल मीडियावर एकाहून एक मिस्कील प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘मोदींच्या पराभवाची जबाबदारी बराक ओबामा यांनी स्वीकारली असून, ते राजीनामा देणार आहेत’ इथपासून ते पार ‘मोदींनी स्वच्छ भारत अभियानात झाडूचा प्रचार केल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होतोय’, इथपर्यंत नानाविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकत होत्या आणि त्यावर कमेंटही येत होत्या. अरविंद केजरीवाल आणि मोदी यांच्या निरनिराळ्या कार्टून्सनीही लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘सिंघम रिटर्न्स’ या शीर्षकाखाली अजय देवगणच्या आणि ‘नायक’मधील अनिल कपूरच्या जागी केजरीवाल यांचा चेहरा पेस्ट केलेले पोस्टरही एकमेकांना शेअर केले जात होते. रात्री उशिरापर्यंत अशा मॅसेजेसची देवाणघेवाण सुरू होती. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस
By admin | Published: February 11, 2015 2:01 AM