नाशिक : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र पावसाने काहीशी चिंता वाढविली आहे.
मागीलवर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यांमध्ये पाण्याची पातळी चांगली होती. त्यामुळे उन्हाळ्यात मे महिन्यांपर्यंत टँकर्स सुरू करण्याची वेळ आली नव्हती. मात्र, मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात काही तालुक्यांकडून टॅंकर्सची मागणी होऊ लागली. जुलैच्या प्रारंभी जिल्ह्यात ४८ टँकर्स सुरू होते. ऑगस्टमध्ये जिल्हा टँकरमुक्त होईल असे वाटत असतांना टँकर्सची तीव्रता वाढतच असल्याने टंचाई निवारण उपाययोजनेला मुदतवाढ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू आहेत.
यंदा अपेक्षित पाऊस होत नसल्याने अजूनही अनेक तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाची रिमझिम आणि अधून मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा असला तरी पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून-जुलै मध्ये देखील अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत गेली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने अनेक गावांमध्य टँकर्स सुरूच होते. आषाढी एकादशीनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू असून बागलाण, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये पाऊस कमी असल्याने टॅंकर्स वाढण्याची शक्यता आहे.
नांदगाव, येवला या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी तीन टॅंकर सुरू आहेत. तर देवळा तालुक्यात दोन तर मालेगाव व नांदगावमध्ये प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहेत. दिवसभरात टॅंकरच्या २७ फेऱ्या सुरू आहेत. एकूण १७ गावे व एक वाडी या ठिकाणी टँकर्स सुरू आहेत.