नाशिक : गेल्या मंगळवारी आलेल्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, कापड बाजारात शिरल्याने संपूर्ण बाजारपेठेला पुराचा वेढा पडला होता. सराफी व्यावसायिकांच्या जवळपास तीनशेहून अधिक दुकानांसह भांडी-कापड बाजारातील सर्व दुकाने पाण्याखाली गेली होती. या पुराचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर बसला असून, कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सराफी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये सुमारे आठ फुटापर्यंत पाणी साचल्याने सर्व फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, वायरिंग, पीओपी, बल्ब, मांडण्या, खुर्च्यांची दुर्दशा झाली आहे. पाण्यामध्ये सर्व दुकाने बुडाल्यामुळे संपूर्ण बाजारपेठच कोलमडून पडली आहे. बुधवारी सकाळपासून तर गुरुवारपर्यंत (दि.४) बहुसंख्य विक्रेत्यांकडून दुकानांची आवरासावर सुरू होती. बाजारपेठेतील व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे. कापड व भांडी विक्रेत्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. चिखलाने दुकानांमधील संपूर्ण माल माखला आहे. त्यामुळे कापडाची विक्री करणेही अवघड होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच भांडी बाजारात विक्रेते मागील दोन दिवसांपासून चिखलाने भरलेली भांडी धूत पुन्हा चकाकी देण्याचा प्रयत्न करताना दिसून आले; मात्र भांड्यांचे नावीन्य हरपल्याने निम्म्या किमतीत विक्री क रण्यास गुरुवारी दुपारनंतर विक्रेत्यांनी सुरुवात केली.२००८च्या तुलनेने यावर्षी महापुराच्या पाण्याने खूप नुकसान झाले नाही. कारण आपत्ती व्यवस्थापनाकडून पुराच्या अगोदरच संपूर्ण बाजारपेठांमध्ये सतर्कतेचा इशारा देत विक्रीच्या वस्तू व अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढेपर्यंत जे व्यापारी मंगळवारी शहरात होते त्यांनी तत्काळ विक्री मालाचे स्थलांतर केले; मात्र फर्निचर व अन्य वस्तू हलविणे बहुसंख्य विक्रेत्यांना शक्य झाले नाही आणि जे व्यापारी मंगळवारच्या सुटीमुळे बाहेरगावी गेलेले होते त्यांना पुराचा अधिक फटका बसला. (प्रतिनिधी)
पावसाने कोट्यवधींना धुतले
By admin | Published: August 05, 2016 1:17 AM