जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे सलग तीन दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केले गेले. हवामान खात्यानेही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. जून महिन्यातच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दीड महिना दडी मारली. जुलैच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातही खरिपाची पेरणी करावी लागली. पुन्हा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे यंदा जून ते सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात ७८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ९२ टक्क्यांवर होते. जवळपास १४ टक्के पाऊस यंदा कमी झाला असून, त्यामुळेच धरणातही जेमतेम पाणी साचले आहे.
नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या ७१ टक्के इतके जलसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा ९० टक्के इतका होता. सध्या सहा धरणे शंभर टक्के भरली असून, अन्य धरणांमध्ये सरासरी ७० टक्के साठा आहे. ज्या धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला. त्यात गौतमी गोदावरी, भावली, वालदेवी, हरणबारी, नाग्यासाक्या व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९४ टक्के इतका जलसाठा असून, समूहात ८८ टक्के इतका साठा आहे. दारणा व पालखेडमध्ये अनुक्रमे ९७ व ९३ टक्के जलसाठा आहे. मात्र दिंडोरीसह लगतच्या तालुक्यांची तहान भागविणाऱ्या ओझरखेडमध्ये अद्यापही ३५, तिसगावमध्ये १९, भोजापूरमध्ये २४ टक्केच पाणी आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ५४ टक्के जलसाठा आहे.
चौकट==
चार तालुक्यांनी टक्केवारी ओलांडली
जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असताना मालेगाव, नांदगाव, देवळा व सिन्नर या दुष्काळी तालुक्यांची वाटचाल शंभर टक्क्यांहून पुढे गेली आहे. नांदगावी चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यात १३४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. तर त्या खालोखाल मालेगाव ११४ टक्के देवळा शंभर टक्के व सिन्नरची शंभरकडे वाटचाल सुरू झाली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यांना अद्याप सरासरी गाठता आलेली नाही.