साथरोगप्रश्नी लक्षवेधी : डेंग्यू-स्वाइन फ्लूचा उद्रेक; सत्ताधाºयांचा प्रशासनावर कौतुकाचा अभिषेक
नाशिक : शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा झालेला फैलाव याला सातत्याने पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर घाण-कचरा करणारे नागरिकच जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने बुधवारी (दि.२०) झालेल्या महासभेत प्रशासनावर कौतुकाचा ‘अभिषेक’ घातला. विरोधी पक्षनेत्यांनी साथरोग प्रश्नाकडे लक्ष वेधले असताना सत्ताधारी भाजपाच्या गटनेत्यांनी प्रशासनाची तळी उचलून धरणारी ‘अनोखी’ लक्षवेधी मांडली. सुमारे सात तास चाललेल्या या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही.महापालिकेच्या महासभेत स्वाइन फ्लू व डेंग्यूच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी लक्षवेधी मांडली. परंतु, बोरस्ते यांच्या लक्षवेधीत साथरोगप्रश्नी प्रशासनाच्या नाकर्त्या प्रवृत्तीवर प्रहार केले गेले असताना मोरुस्कर यांच्या लक्षवेधीतून प्रशासनाचा बचाव करण्यात आला. त्यामुळे, आरोग्याच्या महत्त्वाच्या अशा गंभीर विषयावर महासभेत सरळसरळ दोन तट पडले आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सभागृहाचा सात तासांचा मौल्यवान वेळ वाया गेला. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांकडून आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या कामकाजाबद्दल प्रशंसा केली जात असताना विरोधक मात्र प्रशासनावर तुटून पडले.शहराला एक दिवसाच्या स्वच्छता मोहिमेसारख्या इव्हेंटची नव्हे तर कायमस्वरूपी स्वच्छताविषयक उपाययोजनांची गरज असल्याचे विरोधी पक्षातील सदस्यांनी सांगितले तर सत्ताधारी भाजपातील सदस्यांनी स्वाइन फ्लू, डेंग्यू व मलेरिया या रोगांचा फैलाव होण्यास सातत्याने पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर उष्टी-खरकटे टाकणारे नागरिक जबाबदार असल्याचे सांगत त्यांचे प्रबोधन करण्याची सूचना मांडली. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोधी नगरसेवकांना प्रभागात जनजागृतीची कामे कशाप्रकारे करावीत, याविषयी प्रबोधनही करण्यात आले तर विरोधकांकडून वारंवार सत्ताधारी सदस्यांची खिल्ली उडविली गेली. याचवेळी भाजपाचे शशिकांत जाधव यांनी विरोधकांना उचकावण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्याच अंगलट आला आणि विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. डॉ. हेमलता पाटील यांनी सत्ताधाºयांच्या प्रबोधनावर उपहासात्मक भाष्य केल्यानंतर गोंधळ उडाला आणि महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. सात तास चाललेल्या या सभेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. महासभेत सेना-भाजपातील संघर्ष मात्र प्रकर्षाने दिसून आला.प्रतिनियुक्तीवर आरोग्याधिकारी आणामहापौर रंजना भानसी यांनी आरोग्य व वैद्यकीय अधिकाºयांची काम करण्याची मानसिकता नसेल तर प्रतिनियुक्तीवर शासनाकडून सक्षम अधिकारी आणण्याचे आदेशित केले. तसेच शहरात डुकरे पाळणाºयांवर कारवाई करा, प्लॅस्टिक बंदी करा, नाले दुरुस्ती करा, आउटसोर्सिंगद्वारे सफाई कामगारांची भरती करा, अशा सूचनाही महापौरांनी प्रशासनाला केल्या. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दि. २२ सप्टेंबरपासून होणाºया स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सदस्यांना केले.शहरातील साथरोगप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात तोंडाला मास्क लावून सहभाग नोंदविला.