नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे रविवारी (दि.२७) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन प्रभावित झाले. सकाळपासून पावसाचा जोर दिवसभर कमी-अधिक होता. पावसाने दिवसभरात अल्पशीदेखील उघडीप घेतली नसल्यामुळे नागरिकांनी रेनकोट-छत्रीचा वापर करत आवश्यक दैनंदिन कामे आटोपली. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १८.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रविवार असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकीय तसेच बहुतांश खासगी कार्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल झाले नाही; मात्र खासगी शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची पावसामुळे गैरसोय झाली. संततधारेने उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गटारींची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे नाशिकच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर तलाव साचत असल्याचे चित्र आहे. बहुसंख्य रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली असून, कच पसरली आहे. पुणे महामार्गावर नेहरूनगर, उपनगर, गांधीनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर या परिसरात खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्ग असूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वडाळागाव, अशोका मार्ग, जुने नाशिक, सिडको, इंदिरानगर या भागातदेखील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.‘गंगापूर’मधून दीड हजार क्यूसेक विसर्गशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातूनदेखील विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी दिवसभर साडेपाचशे क्यूसेकने विसर्ग सुरू होता. पहाटेनंतर अडीचशे क्यूसेकने वाढ होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत ७८६ क्यूसेक विसर्ग सुरू होता; मात्र पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढल्यामुळे विसर्ग आठशे क्यूसेकने वाढविण्यात आला. दुपारी १ वाजेपासून दीड हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात धरणातून प्रवाहित करण्यात आले. धरणातून जरी दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असलातरी शहरात होणाºया पावसामुळे रस्त्यांवरून वाहून जाणारे व नाल्यामधील पाण्यामुळे गोदावरीच्या पातळीत रामकुंडापासून पुढे अधिक वाढ झाली आहे. अहल्यादेवी होळकर पुलाखालून सुमारे दोन ते अडीच हजार क्यूसेक पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित होते.
शहरात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:39 AM